महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट ।। सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर बुधवारी उद्धव ठाकरे समर्थक आणि नारायण राणे समर्थक एकमेकांना भिडले. यावेळेस माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांसमोर घरात घुसून मारण्याची भाषा केल्याचं चित्रित झालं. तर दुसरीकडे निलेश राणे हे पोलीस अधिकाऱ्यांबरोबर भांडत असल्याचे व्हिडीओही समोर आले. याच विषयावर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही पोलिसांच्या वर्दीचा सन्मान ठेऊ शकत नाही. उलट तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात, असं म्हणत तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं राऊत फडणवीसांवर टीका करताना म्हणाले आहेत.
पोलिसांवर तुमच्या पार्टीचे कार्यकर्ते थुंकतात
पत्रकारांशी संवाद साधताना राऊत बुधवारी आदित्य ठाकरे राजकोटवर आलेले असताना यांनी निलेश राणे आणि पोलिसांमध्ये झालेल्या बाचाबाचीचा संदर्भ देत टीका केली. “आयएनएस विक्रांतची फाइल कोर्टाने उघडली आहे, असा गृहमंत्र्यांचा कारभार आहे. काल आपण मालवणमध्ये काय पाहिलं? गृहमंत्रालयाला लाज वाटली पाहिजे. त्यांच्या पोलिसांवर त्यांच्या पार्टीचे काही गुंड पोलिसांच्या तोंडावर थुंकले. ज्या पद्धतीने ते पोलीस अधिकाऱ्याला शिव्या देत होते हा गृहमंत्रालयावर थुंकण्याचा प्रकार झाला. काय केलं गृहमंत्र्यांनी? गृहमंत्र्यांचं काम काय आहे? आपल्या विरोधकांविरुद्ध एफआयआर दाखल करा? त्यांच्याविरुद्ध खोटे खटले दाखल करा? पैसे बनवा एवढेच काम आहे? तुमच्या पोलिसांवर तुमच्या पार्टीचे कार्यकर्ते थुंकतात. तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या पोलिसांनी, वर्दीला संरक्षण देणार नाही? महाराष्ट्रातील वर्दीचा तुम्ही सन्मान करत नाही? तुम्ही सत्तेत का बसला आहात? उघडपणे पोलिसांना बघून घेईनच्या धमक्या दिल्या जातात आणि तुम्हाला चिंता पश्चिम बंगालची आहे. राष्ट्रपतींना पश्चिम बंगालची चिंता आहे. जरा महाराष्ट्रात लक्ष द्या,” असा खोचक सल्ला राऊतांनी दिला.
फडणवीसांना लाज वाटली पाहिजे
‘घरातून खेचून एकेकाला मारून टाकेन’ असं नाराणय राणे म्हणाल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत यांनी, “ही गुंडगिरी आहे. मालवणामध्ये जे झालं तो महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. त्यात कोणी आमदार असतील, खासदार असतील मला ठाऊक नाही. पण कालच्या प्रकाराची देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे. पोलिसांची प्रतिष्ठा ते राखू शकले नाहीत. खुले आम भरस्त्यावर पोलिसांची वर्दी फाड्याचा प्रयत्न झाला. केवळ पोलिसांवर हल्ला व्हायचं बाकी होतं. पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला,” असं म्हणाले. पुढे बोलताना राऊत यांनी, “गृहमंत्री समर्थन कतात याचं? काय तर बोलण्याची स्टाइल आहे त्यांची. मग आम्ही बोलतो तर आमच्यावर का गुन्हे दाखल करता?” असा प्रश्न विचारला.