महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। गेल्या काही वर्षांमध्ये दुचाकीसह चारचाकी गाड्यांची विक्रीही वाढली आहे. यासह बाईक आणि कारप्रेमींमध्ये आपल्या वाहनाला आवडता क्रमांकही मिळावा अशी प्रत्येकाची ईच्छा असते. यासाठी अनेक ग्राहक मोठी रक्कमही मोजायला तयार असतात. मात्र, आता महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे गाडीची नंबर प्लेट गाडीपेक्षा महाग होणार आहे.
नव्या नियमांनुसार आपल्या गाडीला व्हीआयपी आणि आवडता क्रमांक मिळवण्यासाठी ग्राहकांना मोठी रक्कम मोजावी लागू शकते. कारण सरकारने यासाठी लागणारे शुल्क वाढवले आहे.
या नवीन नियमांमुळे, आउट-ऑफ-सीरीज व्हीआयपी नंबरची किंमत 18 लाखांपर्यंत जाऊ शकते. इतक्या मोठ्या शुल्कामुळे येवढ्या पैशात नवी कार येईल अशी चर्चा कार ग्राहकांमध्ये रंगली आहे.
राज्य सरकारच्या नवीन शुल्क नियमांनुसार जर एखाद्याला ‘0001’ हा व्हीआयपी क्रमांक पाहिजे असेल तर त्याला 6 लाख रुपये शुल्क भरावे लागतील. अनेकांसाठी हा क्रमांक खास असल्याने त्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे, म्हणूनच त्याचे शुल्कही इतके मोठे आहे.
दरम्यान सरकारने हे नियम मुंबई-पुण्यासारख्या शहरांत लागू केले आहेत. कारण या शहरांत चारचाकी गाड्यांना मोठी मागणी आहे.
व्हीआयपी क्रमांक शुल्क आणि हस्तांतरण नियम
राज्य सरकारने आता व्हीआयपी क्रमांक पती-पत्नी, मुले आणि मुली या कुटुंबातील सदस्यांना हस्तांतरित करण्याची परवानगी दिली आहे. पूर्वी अशा बदल्यांना परवानगी नव्हती.
RTO ने प्रत्येक नोंदणी मालिकेत 240 VIP क्रमांक सूचीबद्ध केले आहेत, ज्यात 0009, 0099, 0999, 9999, आणि 0786 सारख्या क्रमांकांचा समावेश आहे.
या क्रमांकांचे शुल्क चारचाकी वाहनांसाठी 1.5 लाख रुपयांवरून 2.5 लाख रुपये झाले आहे, आणि दुचाकी आणि तीन-चाकी वाहनांसाठी 20 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये झाले आहे.
चारचाकीसाठी प्रतिष्ठित ‘0001’ क्रमांक मिळवण्यासाठी आता 6 लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहे.