महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ सप्टेंबर ।। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यासाठी (Shivaji Maharaj Statue) सरकारने कोट्यवधी रुपयांचं बजेट मंजूर केले होते. मात्र, प्रत्यक्षात हा पुतळा तयार करण्यासाठी 15 ते 16 लाख रुपये लागले असावेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण पुतळ्यासाठी 15 ते 16 कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाले होते. मग हे बाकीचे पैसे कुठे गेले काय माहिती, असे वक्तव्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर आणखी एक गंभीर आरोप केला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवाजी महाराजांचा हा पुतळा साकारणारा जयदीप आपटे पोलिसांना का सापडत नाही, हे सरकारने सांगावे. पोलिसांनी जयदीप आपटे (Jaydeep Apte) याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली, याचा अर्थ तो पोलिसांच्या हाती लागत नाही. मग गृहखाते काय करत आहे? जयदीप आपटे महाराष्ट्रातून पळून गेला असेल तर या सरकारने त्याला मदत केली आहे. तो महाराष्ट्रातच असेल तर मग त्याच्याकडे लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा असेल. मंत्रालयाचा सहावा मजला आणि वर्षा बंगल्यावर गुंड दिसल्याचे अनेक फोटो मी यापूर्वी समोर आणले आहेत. मग जयदीप आपटेही अशाच सुरक्षित जागी लपला असेल. तसं नसेल तर मग जयदीप आपटेला अटक करा, असे आव्हान संजय राऊत यांनी महायुती सरकारला दिले.