महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३ ऑक्टोबर | Zubeen Garg Postmortem Report : लोकप्रिय गायक झुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूरमध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या कारणाबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. आता, सिंगापूर अधिकाऱ्यांच्या हवाल्याने नवीन अपडेट आली आहे. झुबीन यांचे निधन स्कूबा डायव्हिंग करताना नाही, तर सिंगापूरमधील सेंट जॉन्स बेटावर पोहताना बुडाल्याने झाले.
पीटीआयच्या वृत्तानुसार, झुबीन भारत-सिंगापूर राजनैतिक संबंधांच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भारत-आसियान पर्यटन वर्षाच्या समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सिंगापूरमध्ये होते. १९ सप्टेंबर रोजी गर्ग यांना बेशुद्ध अवस्थेत समुद्रातून वाचवण्यात आले आणि सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण त्याच दिवशी त्यांचे दुःखद निधन झाले.
झुबीन गर्ग यांचे निधन कशामुळे झाले?
सिंगापूर पोलीस दलाने (एसपीएफ) झुबीन यांचा शवविच्छेदन अहवाल भारतीय उच्चायुक्तालयाला सादर केल्याची पुष्टी केली आहे. अहवालात मृत्यूचे कारण बुडणे असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या निधनात घातपाताचे कोणतेही संकेत नाहीत. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की त्यांना खून किंवा कोणत्याही हिंसक गुन्हेगारी कृत्याचा संशय नाही. LIMN लॉ कॉर्पोरेशनचे असोसिएट डायरेक्टर आणि कायदेशीर तज्ज्ञ एनजी काई लिंग यांनी द स्ट्रेट्स टाईम्सला सांगितलं की झुबीन यांच्या बुडण्याचे कारण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अजूनही कोरोनरची चौकशी केली जाऊ शकते.
दरम्यान, झुबीन गर्ग यांचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि कार्यक्रमाचे आयोजक श्यामकानू महंता यांना आसाम पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. त्यांच्यावर खून, सदोष मनुष्यवध आणि गुन्हेगारी कट रचल्याचा ठपका ठेवला आहे. दोघांनाही १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दुसरीकडे, झुबीन गर्ग यांच्या पत्नी गरिमा गर्ग यांनी पतीच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी मॅनेजरवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. झुबीन यांच्या मृत्यूसाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. आपल्याला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही तपासाच्या निकालांची वाट पाहत आहोत, असं गरिमा यांनी म्हटलंय.