Pune News : गणेशोत्सवात वाहतूक कोंडीमुळे पुणे वाहतूक प्रशासन सज्ज! तीन दिवस वाहतुकीत बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ सप्टेंबर ।। गणेशोत्सवाला (Ganeshotsav) अवघे काही तास शिल्लक असताना बाप्पाच्या आगमनाची राज्यभरात जल्लोषात तयारी सुरु आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे तर काहीजण गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शहरातील मध्यवस्तीमध्ये निघाले आहेत. मात्र यादरम्यान प्रवाशांची होणारी वाहतूक कोंडी (Traffic) टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून महामार्गावर ड्रोन देखील सोडण्यात येणार आहेत. त्यानंतर पुणे शहरात (Pune) गणेशोत्सवानिमित्त होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून तीन दिवस वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

गणेश प्राणप्रतिष्ठा आणि मूर्ती खरेदीच्या निमित्ताने पुणे शहरातील मध्यवस्तीमध्ये तीन दिवस वाहतूक बदल करण्यात आला आहे. पाच ते सात सप्टेंबर कालावधीत सकाळी सहा ते रात्री १२ या दरम्यान अनेक रस्ते बंद केले असल्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस अमोल झेंडे यांनी केले आहे.

कोणत्या भागातील वाहतुकीत बदल?
गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल डेंगळे पूल ते शिवाजी पूल, श्रमिक भवनसमोर (अण्णा भाऊ साठे चौक) व कसबा पेठ पोलिस चौकी ते जिजामाता चौक तसेच मंडई आणि सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) या भागांत आहेत. तसेच सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. त्यामुळे या भागांतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

कोणते मार्ग बंद?
शिवाजी रोड-गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) परिसर वाहतुकीसाठी बंद असणार आहे.

काय आहेत पर्यायी मार्ग?
गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
शिवाजीनगर येथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
झाशी राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूल मार्गे कुंभार वेशीकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी खुडे चौकातून मनपासमोरून मंगला चित्रपट गल्लीतून कुंभार वेस किंवा प्रीमियर गॅरेज चौक शिवाजी पूल मार्गे, गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभार वेस चौक याठिकाणाहून इच्छितस्थळी जावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *