Subhadra Yojana : महिलांसाठी आणखी नवी योजना सुरु होणार; मिळणार दरवर्षी ‘इतके’ रुपये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ सप्टेंबर ।। देशभरातील महिला वर्गासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महिलांना (Women) आर्थिक पाठबळ देण्यासाठी राज्यभरात महिलांसाठी नवनवीन योजना सुरु आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी देखील विविध राज्यांमधील सरकारकडून महिलांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. अशातच आता आणखी नवी योजना (New Scheme) सुरु करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी १०हजार रुपये देण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिसा सरकारने महिलांसाठी ‘सुभद्रा योजना’ (Subhadra Yojana) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ५ वर्षात ५० हजार रुपये दिले जाणार आहेत.

कोणत्या महिला योजनेसाठी पात्र?
सुभद्रा योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी महिलांचे वय २१ ते ६० वर्षे दरम्यान असावे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मूळ ओडिशा राज्यातील असणेही आवश्यक आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात कोणीतरी सरकारी नोकरी करत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ६० वर्षाच्या पुढच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या घरात आयकर भरणारे सदस्य आहेत त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर एखादी महिला आधीच राज्याच्या कोणत्याही योजनेंतर्गत लाभ घेत असेल. त्यानंतरही त्याला सुभद्रा योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

कधीपासून होणार सुरु?
सुभद्रा योजना १७ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात कार्यान्वित होणार आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार महिलांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे हप्ते वर्षातून दोन वेळा देणार आहे. पहिला हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिला जाईल, तर दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यावर पाठवला जाईल.

असा करा अर्ज
सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिस किंवा मो-सेवा केंद्र आणि जनसेवा केंद्रातून फॉर्म गोळा करावा लागेल. महिलांना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. योजनेचा फॉर्म भरून संबंधित कागदपत्रांसह अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये जमा करावा लागेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *