महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ सप्टेंबर ।। भारतात एमपॉक्स (मंकीपॉक्स)चा पहिलाच संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. मंकीपॉक्स संक्रमणाच्या केसेस आढळत असलेल्या देशातून नुकतेच प्रवास केलेला एक तरुण हा मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी याबद्दल माहिती दिली आहे. या रुग्णाला सध्या रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे आणि सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
एमपॉक्सशी लढा देत असलेल्या देशातून परतलेल्या या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. डब्लूएचओने एमपॉक्सला ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी घोषित केले असून सध्या अनेक देशांमध्ये याची असंख्य प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात देखील अनेक दिवसांपासून प्रशासनाकडून याबद्दल खबरदारी घेतली जात आहे.
तसेच अशा प्रकारच्या घटनांना समोरे जाण्यासाठी देश तयार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच संभावित धोका रोखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी भक्कम उपाय करण्यात आले असल्याचे देखील सांगण्यात आले. दरम्यान जागतीक आरोग्य संघटनेकडून १२ आफ्रिकन देशात सुरू असलेल्या एमपॉक्सच्या प्रकोपामुळे याला ग्लोबल इमर्जन्सी जाहीर केल्याच्या तीन आठवड्यानंतर भारतात संशयित एमपॉक्सचे प्रकरण समोर आले आहे.
एमपॉक्सचे काही दिवसांपासून अनेक देशांमध्ये रुग्ण आढळत आहेत. ज्यानंतर जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. जगातील ११६ देशांमध्ये एमपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. २०२२ मध्ये देखील डब्लूएचओने याबद्दल इमर्जन्सी जाहीर केली होती. या व्हायरसमुळे काँगेमध्ये आतापर्यंत ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १८ हजारांहून अधिक प्रकरणे या वर्षभरात समोर आले आहेत. यासोबतच पाकिस्तानात देखील नुकतेच एमपॉक्सच्या रुग्णांच्या संख्येत वाढ पाहायल मिळाली होती. पाकिस्तानात एकूण पाच प्रकरणे समोर ली आहेत.