महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ सप्टेंबर ।। एकदा बारामतीचा आमदार बदलला तर तुम्हाला कळेल. तुम्हाला न सांगता इतका विकास करतोय, असे म्हणत अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच विधानसभेला बारामतीतून न लढण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहेत. बारामतीत एवढे काम करून देखील लोकसभेला अजित पवार यांना लोकसभेला मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याची खंत त्यांनी आज बारामती दौऱ्यादारम्यान आयोजित शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनातल्या जनता दरबारात व्यक्त केली. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी होती.
यावेळी बोलताना ‘माझ्या राजकीय कारकीर्दीला जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली, त्यामुळे मी एका कारखान्याचा संचालक ते आज वेगवेगळ्या पदावर काम करत आहे. मला जी संधी मिळाली ती कोणालाच मिळाली नाही, पाचव्यांदा मी उपमुख्यमंत्री पदावर काम करत आहे. माझा बारामतीचा विकास करत असताना कुठलाही स्वार्थ नाही. शेवटी ही काही एकट्याची मक्तेदारी नाही. मतदार राजाला आपण बळजबरी करू शकत नाही. असे 34 वर्षात अनेक अनुभव आले आहेत, पण मी कधी कोणाला बोलून दाखवत नाही, असेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.“आता मीही ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा. मग तुम्ही ९१ ते २०२४ च्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या कारकिर्दीची तुलना करा”, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.