महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ सप्टेंबर ।। मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल होत असून कधी ऊन तर कधी पावसाचा खेळ सुरू आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखीच तीव्र झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. भारतीय हवामान खात्याने आज सोमवारी(ता. ९) कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Heavy Rain) पडू शकतो, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता आहे. रविवारी ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्यातच आता राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा ३१ अंशाच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.
This GIF shows a Well Marked Low Pressure Area lying over the northwest & adjoining central Bay of Bengal today along with a cyclonic circulation lying over central Rajasthan & neighbourhood. (1/3) pic.twitter.com/DVagqOKXTR
— India Meteorological Department (@Indiametdept) September 7, 2024
आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?
भारतीय हवामान खात्याने आज कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्राच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाच्या सरी (Rain Alert) कोसळणार आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा. जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात दिवसभर रिमझिम पावसाची शक्यता आहे. उर्वरित ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी तापमानात वाढ होईल, असंही भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.