CNG Price Hike: पुणे पिंपरी चिंचवड करांच्या खिशाला झळा ; CNG महागला, काय आहेत नवे दर?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ सप्टेंबर ।। गणेशोत्सव सुरू होऊन अवघे दोनच दिवस झाले आहेत. अशात पुणेकरांच्या खिशाला आता इंधन दर वाढीच्या झळा बसणार आहेत. कारण पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) किंमतीत 90 पैशांनी वाढ करण्यात झाली आहे.

या पूर्वी पुणे परिसरात 85 रुपये दराने एक किलो सीएनजी मिळायचा. आता त्यासाठी 85.90 रुपये मोजावे लागतील. हे नवीन दर आजपासून लागू झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र यावेळी पीएनजीच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या नॅचरल गॅसच्या किमती वाढल्याने आणि आयात खर्च वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे एमएनजीएल ने सांगितले.

पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या शहरांना सीएनजी पुरवठा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (MNGL) करण्यात येतो. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय नॅचरल गॅस बाजारपेठेत वाढत्या किमतीमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. ही वाढ नाममात्र असली तरी सीएनजीची वाढती मागणी आणि आयात खर्च यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.

CNGच्या दरांमध्ये वाढ केल्यानंतर एमएनजीएलने म्हटलं आहे की, आजही सीएनजी हा पारंपरिक इंधनाचा स्वस्त पर्याय आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीमुळे ४९ टक्के बचत होते. डिझेलच्या तुलनेत सीएनजी 27 टक्के स्वस्त आहे. रिक्षाचालकही पेट्रोल किंवा डिझेलऐवजी सीएनजी वापरून 29 टक्के बचत करतात.

दरम्यान, यापूर्वी जुलैमध्येही सीएनजीच्या दरात किलोमागे 1.50 रुपयांची वाढ झाली होती. यानंतर आता सीएनजीची किंमत 85 रुपये किलो झाली आहे.

सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून या पर्यावरणपूरक इंधनाकडे वळणाऱ्या वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *