![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० सप्टेंबर ।। गणेशोत्सवात राज्यात पावसाचा जोर वाढणार असून आज म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तर ११ सप्टेंबरलाही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात राज्यात पाऊस हजेरी (Maharashtra Rain) लावणार आहे. मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यात आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. तर बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये दिवसभर पावसाची शक्यता (Heavy Rain Today) आहे. दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात रिमझिम पावसाचा अंदाज आहे. पुण्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
9 Sept: कोंकणात,मध्य महाराष्ट्रात घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता.
उत्तर मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40kmph), मध्यम पाऊस शक्यता.@imdnagpur @RMC_Mumbai pic.twitter.com/lt0lDGHaOE— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 9, 2024
पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून पुणे, सातारा व विदर्भ वगळता सर्वत्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे कमाल तापमानात देखील वाढ झाली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा तयार होण्याची शक्यता आहे.
राज्यातील अनेक धरणं शंभर टक्के भरली
पावसाची संततधार सुरु असल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यातील अनेक धरणं काठोकाठ भरली आहे. त्यामुळे दोन्ही शहरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटलाय. दुसरीकडे संपूर्ण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात तब्बल 98 टक्के पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
