महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। पुणे – विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकातील सदस्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचे ढोल-ताशा पथकांनी स्वागत केले आहे. तसेच सदस्य संख्येवर निर्बंध नसले, तरी मिरवणुकीला लागणारा वेळ आणि ध्वनी प्रदूषणाचा विचार करता पथकांतील सदस्य संख्या मर्यादित ठेवण्यात येईल, अशी प्रतिक्रिया विविध पथकांनी व्यक्त केली.
वाढत्या प्रदूषणाचे कारण देत राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गणपती विसर्जन मिरवणुकीत सामील होणाऱ्या ढोल-ताशा, झांज पथकातील सदस्यांच्या संख्येवर मर्यादा घातली होती. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. त्यामुळे आता विसर्जन मिरवणुकीत पथकातील सदस्यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत.