Vanraj Andekar Death Case: साक्षीदार शिवम आंदेकरच्या जीवास धोका ; पोलिसांकडून संरक्षण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। Vanraj Andekar Death Case Update: पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. या हत्येच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी वेगाने तपास करत आत्तापर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली आहे. अशातच आता वनराज आंदेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली असून हत्येच्यावेळी प्रत्यक्षदर्शी असलेल्या शिवम आंदेकरच्या जिवाला धोका असून त्याला आता पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील नाना पेठेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगसेवक वनराज आंदेकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सायंकाळच्या वेळी वनराज आंदेकर हे नाना पेठेतील चौकात उभे असतानाच गाड्यांवरुन आलेल्या १०- १५ जणांनी त्यांच्यावर गोळ्या आणि कोयत्याने हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांचा पुतण्या शिवम आंदेकरही त्यांच्यासोबत होता.

दोघेही सोबत उभे असतानाच हल्लेखोरांनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या तसेच कोयत्याने हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी शिवम आंदेकरलाही मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रसंगावधान राखून तो पळाल्याने त्याचा जीव वाचला. या हल्ल्यातून वाचल्यानंतर शिवम आंदेकर याच्या जिवाला धोका आहे. त्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी त्याच्या वकिलांनी केली होती. या मागणीनंतर आता वनराज आंदेकर यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदार असलेल्या शिवम आंदेकर याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

दरम्यान टोळीयुद्ध, अंतर्गत वाद आणि घरगुती कलहातून वनराज आंदेकर यांचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे आत्तापर्यंतच्या तपासामध्ये समोर आले आहे. वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली असून आठ बंदूका, १३राऊंड , सात दुचाकी आणि एक चार चाकी जप्त करण्यात आली आहे. २१ आरोपींमध्ये वनराज आंदेकर यांच्या बहिणीचाही समावेश असून यामधील तीन आरोपी अल्पवयीन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *