![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ सप्टेंबर ।। राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे, पण दोन ते तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या त्या मध्यम सरी कोसळतील असा अंदाज आहे.
मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरूवात केला असून आझ मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आळी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात देखील आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे.
सध्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात जोरदार पाऊस होत आहे. या राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने अनेक राष्ट्रीय महामार्गांसह ४०० हून अधिक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. बद्रीनाथ महामार्गही शुक्रवारी दिवसभर बंद पडला होता. तर केदारनाथ पदपथ दुसऱ्या दिवशीही खुला होऊ शकला नाही.
पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळेजनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील तीन दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असून हवामान खात्याने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह 18 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये अतिमुसळधार पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. याशिवाय उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, सिक्कीम, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि सर्व ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
