महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – मुंबई – ता. २३ जुलै – महाराष्ट्रात मिशन बिगिन अगेनची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. लवकरच व्यायामशाळा, शॉपिंग मॉल पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार विचार करीत आहे. मात्र लोकल ट्रेन सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी विविध विषयांवर माहिती दिली. मुंबईतील नोकरदारांसाठी लोकल ट्रेन पुन्हा सुरू करण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मुंबईत अगदी विरार, कल्याण भागापासून दररोज असंख्य लोक कामावर येतात. त्यांच्यासाठी लोकल ट्रेन सुरु करण्याची रास्त मागणी आहे. पण ट्रेनमध्ये शारिरीक अंतर पाळले जात नाही. त्यामुळे ट्रेन सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.