महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ सप्टेंबर ।। गणेशोत्सवाचे सुरुवातीचे दिवस गाजवणारा पाऊस गौरी- गणपती विसर्जनानंतर मात्र कुठे दडी मारून बसला. पहाटेच्या वेळी येणारी एखादी सर वगळता हा पाऊस दिवसभर नाहीसाच होत होता. पण, आता मात्र गणेशोत्सवाच्या सांगतेसह या पावसानं राज्यात पुन्हा एकदा एन्ट्री केल्याचं पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पाऊस पुन्हा जोर धरणार असून, परतीच्या प्रवासाआधी तो राज्यात पुन्हा त्रेधातिरपीट उडवताना दिसणार आहे. त्यामुळं पाऊस अद्यापही राज्याबाहेर गेला नाही हेच पुन्हा सिद्ध होत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांसाठी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात शहरात अंशत: ढगाळ वातावरण असेल. तिथं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागांमध्येही पावसाच्या सरी अडचणी वाढवताना दिसतील.
सध्या राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली असून, अधुमधून येणाऱ्या सरी गोंधळ उडवताना दिसत आहेत. पुढील किमान पाच दिवस अशीच स्थिती कायम राहणार असून, बहुतांशी या पावसाचा जोर वाढताना दिसेल. इतकंच नव्हे, तर राज्यात साधारण 2 ऑक्टोबरपर्यंत पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, हा पाऊस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आणखी जोर धरू शकतो.
देशातही पावसाची स्थिती काही वेगळी नाही. उत्तर भारतापासून उत्तराखंडपर्यंत पावसाच्या सरींची हजेरी असून, काही भागांमध्ये या पावसामुळं दरडी कोसळण्याच्या प्रमाणात वाढ होऊ शकते अशा शब्दांत हवामान विभागानं प्रशासनाला सतर्क केलं आहे. आयएमडीच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि राजस्थानह केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी असेल.