Akshay Shinde : विकृत अक्षय शिंदे च्या गळ्याभोवतीचा फास अधिक घट्ट ; अंगात हैवान संचारायचा अक्षय शिंदेच्या दुसऱ्या बायकोचा आरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० सप्टेंबर ।। बदलापुरातील अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर आरोपी अक्षय शिंदे याला अटक झाली. त्याच्या विरोधात तपास यंत्रणेने पुरावे गोळा केले आहेत. अक्षयच्या पहिल्या पत्नीच्या जबाबानंतर आता दुसऱ्या बायकोनेही त्याच्या विरोधात जबाब नोंदवला आहे. अक्षय अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा, असा आरोप तिने केला आहे. अक्षयच्या विकृतपणामुळेच आपण माहेरी निघून गेल्याचंही तिने जबाबात म्हटलं आहे.

बदलापूर येथील दोन शाळकरी चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने दुसऱ्या पत्नीचा जबाब नोंदवला. कल्याणच्या विशेष पॉक्सो न्यायालयात या प्रकरणातील दोन एफआयआरवरुन दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत.

दुसऱ्या पत्नीने बोईसर पोलीस ठाण्यात आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता हे प्रकरण तपासासाठी बदलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

लैंगिक संबंधांवेळी हैवानासारखं वागायचा
दरम्यान, याआधी अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीनेही अक्षय हा शरीरसंबंध प्रस्थापित करताना हैवानासारखा वागत असल्याचे नमूद केले होते. आता दुसऱ्या पत्नीने देखील त्याचा विकृतपणा उघड केल्यामुळे त्याच्या गळ्याभोवती फास अधिक घट्ट झाला आहे.

साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपपत्र
विशेष तपास पथकाने तांत्रिक, वैद्यकीय पुरावे, तसेच साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींच्या कबुलीजबाबात दोन आरोपपत्रे तयार केली, त्यांची एकत्रित पृष्ठसंख्या ५०० पेक्षा झाली आहे. पुरावा म्हणून घटनेच्या दिवशी शाळेच्या मुख्य गेटमधून प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज जोडण्यात आले आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये वर्ग करण्याची मागणी देखील एसआयटीच्या टीमने राज्य सरकारकडे केली आहे. एसआयटीच्या प्रमुख आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली बदलापुरातील अत्याचार प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

मुख्याध्यापिकेला जामीन
बदलापूर अत्याचार प्रकरण ज्या शाळेत घडले, तिथल्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना आता जामीन मंजूर झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *