![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ मार्च २०२६ ।। राज्यातील लाखो महिलांसाठी महत्त्वाची असलेली लाडकी बहीण योजना आता एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ₹१५०० च्या हप्त्यासाठी ई-केवायसी (eKYC) अनिवार्य करण्यात आली असून अनेक महिलांनी घाईत किंवा प्रश्न नीट समजले नाहीत म्हणून चुकीची माहिती भरल्याची बाब समोर आली आहे. परिणामी अनेक लाभार्थ्यांचे पैसे थांबले आहेत. मात्र महिला व बालविकास विभागाने या चुका सुधारण्यासाठी आता अखेरची संधी दिली आहे. त्यामुळे ज्या महिलांकडून ईकेवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले गेले असतील, त्यांना ती माहिती दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही संधी गमावली तर योजनेचा लाभ थांबण्याची शक्यता असल्याने लाभार्थ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेत ईकेवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती आणि त्यानंतर नवीन ईकेवायसीची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. मात्र ज्यांनी आधीच ईकेवायसी केली पण त्यात चुका झाल्या आहेत, अशा महिलांसाठी दुरुस्तीची विशेष सुविधा देण्यात आली आहे. ही दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच पुढील काही दिवसांतच ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अनेक महिलांना प्रश्न समजले नाहीत, किंवा घाईघाईत चुकीची उत्तरे दिली गेली. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झाला आहे. आता ही चूक दुरुस्त केल्यास लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. त्यामुळे “नंतर पाहू” म्हणत वेळ दवडण्यापेक्षा तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
ईकेवायसीमधील चूक दुरुस्त करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे. सर्वप्रथम लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉगिन करायचे आहे. त्यानंतर ‘ईकेवायसीमध्ये चुकीचे पर्याय निवडले गेले’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे. पुढे काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आहेत. माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मोबाईलवर येईल. त्यानंतर लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनी ही शेवटची संधी वाया जाऊ न देता त्वरित ईकेवायसी दुरुस्ती करून ₹१५०० चा हप्ता सुरक्षित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
