महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ सप्टेंबर ।। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला घवघवीत यश मिळालं. महाराष्ट्रात विजयाचा सर्वाधिक स्ट्राइक रेट त्यांच्याच पक्षाचा राहिला. आता आगामी विधानसभेतही याच स्ट्राइक रेटने विजय मिळवता यावा यासाठी शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. दुसरीकडे अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का देण्यासाठी त्यांनी मोठा प्लान आखला आहे. शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत नवी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी अजित पवार गटाला निवडणूक चिन्हे देण्यात यावं, अशी मागणी शरद पवार (Sharad Pawar) गटाने केली आहे. यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी खंडपीठाकडे आहे. त्यांची ही मागणी मान्य झाली असून येत्या २५ सप्टेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे.
शरद पवार यांच्या या नव्या खेळीमुळे अजित पवार गटाचं चांगलंच टेन्शन वाढलंय. खंडपीठाने जर त्यांच्या याचिकेवर सकारात्मक निकाल दिला तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हातातून घड्याळ चिन्ह जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील २ वेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेंशन करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोर्टाने त्यावर सुनावणी घेतली नव्हती.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे नवीन पक्षचिन्ह दिले होते. इतकंच नाही तर आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नाव वापरण्याची त्यांना परवानगी दिली होती. यावर निवडणूक लढवत शरद पवार गटाने मोठा विजय संपादित केला. दुसरीकडे घड्याळ चिन्ह हातात असूनही अजित पवार गटाला मोठा पराभव सहन करावा लागला.
दरम्यान, शरद पवार यांनी अगदी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयावर भाष्य केलं होतं. अजित पवार यांनी साथ सोडल्यानं धक्का बसला नाही पण अस्वस्थता वाटली, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार एकटेच नाही तर त्यांच्यासोबत विधिमंडळातील 25-30 सभासद गेले. अनेकांच्या निवडणुकीच्या यशासाठी तिथं गेलो असेन, त्यांच्यासाठी भाषणं केली असतील. गेल्या पाच दहा वर्षात त्यांना ग्रुम केलं असेल, असंही पवार म्हणाले होते