महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा आज पोलिसांनी एन्काऊंटर केला. पोलीस अक्षयला तळोजा कारागृहातून नेत असताना त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी सेल्फ डिफेन्समध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. अक्षयने एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. याच घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ”बदलापूर दुर्घटनेमधील गुन्हेगार अक्षय शिंदे याला तपासासाठी आणत असताना ही घटना घडली. त्याच्या पहिल्या पत्नीने देखील अत्याचाराचे आरोप केले होते. अशा गुन्हेगाराला तपासाकामी आणल असता त्याने पोलिसांची बंदूक खेचली आणि फायरिंग केली. यात एपीआय गणेश मोरे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर पोलीस देखील जखमी आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे”
शिंदे म्हणाले, ”स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला, अशी प्राथमिक माहिती आहे. पोलीस तपास सुरू आहे.” यावरच विरोधक आता प्रश्न उपस्थित करता आहेत. यावर बोलताना ते म्हणाले, ”सुरुवातीला विरोधक फाशीची मागणी करत होते. आता विरोधक आरोपीची बाजू घेत असतील तर, हे दुर्दैवी आहे.”
‘अशा प्रकारचे आरोपीची बाजू घेणे निंदाजनक’
विरोधकांवर टीका करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ”अशा प्रकारचे आरोपीची बाजू घेणे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.” ते म्हणाले, पोलीस जखमी आहे, त्याचं काही देणंघेणं विरोधी पक्षाला नाही. पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. सणावाराला रस्त्यात उन्हात पावसात उभे असतात. कुटुंबापासून लांब राहतात. अशा पोलिसांबद्दल आक्षेप घेणे, प्रश्नचिन्ह निर्माण करणे दुर्दैवी आहे.”