Video Akshay Shinde : हात बांधलेले, तोंडावर बुरखा, ‘याने पोलिसांवर हल्ला केला?’ ; कुणाला वाचविण्यासाठी हा बनाव ? ; खासदार संजय राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ सप्टेंबर ।। बदलापूरमध्ये दोन बालिकांवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अक्षयचा व्हिडिओ शेअर करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

“याने पोलिसांवर हल्ला केला? अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होते, तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे।” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

अक्षय शिंदेला अन्य एका गुन्ह्या प्रकरणी पोलिस तळोजा कारागृहातून पोलिस वाहनाने घेऊन जात असताना त्याने एका पोलिस अधिकाऱ्याकडील पिस्तूल हिसकावून पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला. अक्षयने झाडलेल्या गोळीने एक पोलिस अधिकारीही जखमी झाला आहे.

नेमकं काय घडलं?
अक्षय शिंदे याला सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. पोलिस वाहनाने त्याला ठाण्यात आणले जात होते. हे वाहन संध्याकाळी ६ ते ६.१५ वाजताच्या दरम्यान मुंब्रा बाह्यवळण मार्गावर आल्यानंतर अक्षयने पोलिस पथकातील सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांच्याकडील पिस्तूल हिसकावले आणि पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या.

यापैकी एक गोळी मोरेंच्या डाव्या पायाच्या मांडीला लागली. त्यावेळी पोलिस पथकातील एका अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ अक्षयच्या दिशेने एक गोळी झाडली. ही गोळी लागून अक्षय जखमी झाल्याची माहिती पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *