भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; ‘तुतारी’ हाती घेण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ सप्टेंबर ।। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. त्यात सुरुवातीला कागलमधील भाजपा नेते समरजितसिंह घाटगे यांनी पक्षाला रामराम करत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपातील अनेक नाराज नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. आता भाजपातील पिचड पिता पुत्र जोडीने शरद पवारांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतल्याचं समोर आले आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महायुतीत अकोले विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जात असल्याने पिचड कुटुंबीय वेगळा पर्याय शोधण्याच्या मार्गावर आहेत. आज मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांची भेट घेत जवळपास अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीमुळे लवकरच हे दोन्ही नेते पुन्हा घरवापसी करतील असं बोललं जाते. मधुकर पिचड हे आधी राष्ट्रवादीत होते, त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे मात्र २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात अकोले मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्यामुळे पिचडांना त्याठिकाणाहून उमेदवारीची संधी आहे. मागील वेळी शरद पवार अकोले इथं असताना पिचड कुटुंब त्यांची भेट घेतील अशी चर्चा होती मात्र ही भेट झाली नव्हती. परंतु आता या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली. या नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. वैभव पिचड हे अकोले विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे किरण लहामते हे आमदार आहेत.

मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली – जयंत पाटील
दरम्यान, परवा एक मोठा नेता आपल्या पक्षात येण्याची इच्छा व्यक्त करत होता. मतदारसंघात फिरलो, तर सगळे म्हणतात हातात तुतारी घ्या, नाहीतर आपलं काही खरं नाही असं त्यांनी सांगितले. तुतारी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात विजयी होणार नाही असे अनेक मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नेत्यांना वाटायला लागलं आहे हीच महाराष्ट्रात शरद पवारांची ताकद आहे असं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *