महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – अजय सिंग – नवीदिल्ली – ता. २५ जुलै – वाहतुकीचे नियम पालनाच्या अनुषंगाने स्वयंचलित दुचाकी दुर्लक्षित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवा निर्णय जाहीर केला आहे. दुचाकी चालवणारे आणि दुचाकीवर मागे बसणार्यांसाठी काही नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार दुचाकीवर मागे बसणार्या व्यक्तीसाठी दुचाकीला मागील बाजूस ‘हँड होल्ड’ (पकड) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार, दुचाकीस्वारांच्या मागे बसणार्यांची सुरक्षाही केंद्राने लक्षात घेतली आहे. दुचाकीच्या मागच्या बाजूला पकड बसविण्याचा नियम केला आहे. जेणेकरून मागे बसलेला ती पकडून बसू शकेल व मोक्याच्या वेळी त्याचा तोल जाण्याची शक्यता टळेल. सध्या रस्त्यांवर धावत असलेल्या दुचाकींतून अशी सोय नाही; पण ती करावी लागणार आहे. त्याशिवाय डबल सीट चालविणे नियमभंग ठरणार आहे. शिवाय, दुचाकीवर दोन्ही बाजूंना पाय ठेवायला पायदानही अनिवार्य असणार आहे. मागील चाकाचा डावा भाग अर्धा झाकलेला असावा, जेणेकरून मागे बसणार्याचे विशेषत: महिलेचे वस्त्र (साडी, ओढणी) चाकात अडकण्याचा धोका टळेल.
दुचाकीत हलका कंटेनर बसवण्याचे आदेशही या नियमावलीनुसार देण्यात आले आहेत. कंटेनरची लांबी 550 मि.मी., रुंदी 510 मि.मी. आणि उंची 500 मि.मी.हून अधिक नसावी. कंटेनर मागील सीटच्या जागेवर लावलेला असेल, तर दुचाकीवर केवळ चालकालाच परवानगी असेल. म्हणजेच डबल सीटला परवानगी नसेल.
याआधी सरकारकडून टायरबद्दलही नियमावली जारी करण्यात आली होती. कमाल 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी ‘टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम’ बसविण्याचा सल्ला त्यात देण्यात आलेला आहे. ही सिस्टीम बसविल्याने सेंसरद्वारे चालकाला टायरमधील हवेची स्थिती कळत राहते. टायर दुरुस्ती किटही जवळ बाळगावे, असे यात म्हटलेले आहे. असे केल्यास अतिरिक्त टायरची गरज पडणार नाही.
वेळोवेळी नियमांत बदल
इथून पुढेही दुचाकीबाबत नवनवीन नियम वेळोवेळी जारी करण्यात येतील किंवा या नियमांत बदलही करण्यात येतील, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.