महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ सप्टेंबर ।। शिवसेना आणि दसरा यांचं अनेक दशकांपासूनचं नातं आहे. शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी इतिहासातील सगळ्यात मोठी फूट पडली. त्यानंतर शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला आणखी महत्त्व प्राप्त झालं. कारण शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होऊ लागले. त्यातून एकमेकांवर टिकेचे बाण सोडले जाऊ लागले. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरुन रस्सीखेच होऊ लागली. ठाकरेसेनेचा यंदाचा मेळावा शिवाजी पार्कातच होणार आहे. त्यामुळे ठाकरेंनी मैदान मारलं आहे. तर शिंदेसमोर आता दोन पर्याय उरले आहेत.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरुन आधी झालेली खेचाखेची पाहता ठाकरेंच्या शिवसेनेनं यंदा हुशारी दाखवली. मागील घटनांमधून बोध घेत त्यांनी ८ महिन्यांपूर्वीच शिवाजी पार्कसाठी अर्ज करुन ठेवला होता. त्यामुळे त्यांना शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदेसेनेनं शिवाजी पार्कसाठी अर्ज केलेलाच नव्हता. त्यामुळे ठाकरेसेनेला शिवाजी पार्क मिळवण्यात फारशी अडचण आली नाही.
शिंदेसेनेनं दसरा मेळाव्यासाठी दोन पर्याय ठेवलेले आहेत. बीकेसी आणि आझाद मैदानासाठी शिंदेसेनेनं आरक्षण करुन ठेवलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दोन्ही ठिकाणांची पाहणी करुन मेळाव्यासाठी ठिकाण निश्चित करतील. त्यानंतर दसरा मेळाव्याच्या तयारीला सुरुवात होईल. याआधी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरुन दोन्ही शिवसेनेत बरीच खडाजंगी रंगली होती.
शिंदेसेनेनं दसरा मेळाव्यासाठी दोन पर्याय ठेवले आहेत. बीकेसी आणि आझाद मैदान शिंदेसेनेनं आरक्षित केलेलं आहे. यातील बीकेसीचा पर्याय निवडला जाऊ शकतो. याआधी शिंदेसेनेचा मेळावा बीकेसीत झालेला आहे. बीकेसी प्रवासाच्या दृष्टीनं अधिक सोयीस्कर आहे. या भागात पार्किंगचा प्रश्न फारसा येत नाही. शिवसैनिकांना येण्याजाण्यासाठी बीकेसी अधिक सुलभ आहे. त्यामुळे बीकेसीची निवड दसरा मेळाव्यासाठी केली जाण्याची शक्यता अधिक आहे.
अमित शहा महाराष्ट्रात, मशालीचा भाजपला धक्का; बाजारबुणगा म्हणत उद्धव ठाकरे कडाडले
लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले दसरा मेळावे महत्त्वाचे आहेत. या मेळाव्यांमधून मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेनं १५ जागा लढवत ७ जागा जिंकल्या. तर ठाकरेसेनं २१ जागा लढवत ९ जागांवर बाजी मारली. दोन्ही शिवसेना १३ जागांवर आमनेसामने आल्या. त्यातील ७ जागा शिंदेसेनेनं, तर ६ जागा ठाकरेसेनेनं जिंकल्या