Missing link project: मुंबई–पुणेकरांनो, घाटातून सुटका! ‘मिसिंग लिंक’ येतेय, वेळ वाचतोय—सत्ता झोपतेय की जागतेय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिनांक २५ फेब्रुवारी २०२६।। मुंबई आणि पुणे या दोन शहरांची कहाणी म्हणजे वेग, व्यापार आणि वेदना यांची त्रयी! वर्षानुवर्षे लोणावळा–खंडाळ्याच्या वळणदार घाटात गाड्या धापा टाकत चढतात, ब्रेकांचा करुण क्रंदन ऐकू येतो आणि चालक देव पावो म्हणून स्टीयरिंग पकडून बसतो. आता म्हणे ‘मिसिंग लिंक’ येतेय! नावातच नाट्य—जे नव्हते ते जोडणार, जे अडकले होते ते सोडवणार. १ मे, महाराष्ट्र दिनी हा नवा मार्ग खुला करण्याचा इरादा जाहीर झाला आहे. इरादा चांगला, घोषणा टणक, पण जनतेला हवे परिणाम! 19.8 किमीचा वळणांचा साप आता 13.3 किमीचा सरळ नाग होणार, 25–30 मिनिटे वेळ वाचणार, असे सांगितले जाते. वेळ म्हणजे पैसा, आणि पैसा म्हणजे जनतेचे रक्त! म्हणूनच या प्रकल्पाकडे लोकांचे डोळे लागले आहेत—कारण हा केवळ रस्ता नाही, तर दैनंदिन आयुष्याचा श्वास आहे.

घाटातील धोकादायक वळणे टाळून सुरक्षित, सरळ आणि वेगवान प्रवास—हे चित्र कागदावर सुंदर दिसते. पण महाराष्ट्राच्या इतिहासाने आपल्याला शिकवले आहे की, कागदावरचे स्वप्न आणि जमिनीवरील सत्य यांच्यात नेहमीच एक दरी असते. ‘मिसिंग लिंक’ ती दरी भरून काढेल का? अपघातांची संख्या कमी होईल का? चालकांना खरी व्हिजिबिलिटी मिळेल का? हे प्रश्न केवळ विरोधकांचे नाहीत; ते प्रत्येक कुटुंबाचे आहेत ज्यांचा माणूस रोज या मार्गाने प्रवास करतो. प्रशासन सांगते—काम अंतिम टप्प्यात आहे. जनता म्हणते—टप्पे नकोत, परिणाम द्या! महाराष्ट्र दिनी फित कापणे सोपे; पण त्या फितीमागचा दर्जा, टिकाऊपणा आणि सुरक्षितता हेच खरे मोजमाप असते. रस्ता फक्त काँक्रीटचा नसतो; तो विश्वासाचा असतो.

आता टोलचा मुद्दा! वेग वाढला की दर वाढतात, हीच तर आपली शोकांतिका. मात्र अधिकाऱ्यांनी दिलासा दिला आहे—टोलमध्ये अचानक मोठी वाढ नाही. वसुलीचा कालावधी 2045 पर्यंत वाढवला जाईल, पुढील आढावा 2030 मध्ये. म्हणजे जनतेच्या खिशाला तातडीचा झटका नाही; पण दीर्घकालीन हिशेब मात्र लांबवला आहे. दररोज 75 हजार गाड्या, सुट्टीला 1.20 लाख—हा प्रवाह थांबणारा नाही. म्हणून ‘मिसिंग लिंक’ ही केवळ सोय नव्हे; ती गरज आहे. परंतु लक्षात ठेवा—रस्ता तयार झाला म्हणजे विकास झाला, असे नाही. विकास तेव्हा होतो जेव्हा वेळ वाचतो, जीव वाचतो आणि खिशालाही दिलासा मिळतो. महाराष्ट्र दिनी जर हा मार्ग खरोखर खुला झाला आणि जनतेला दिलेला शब्द पाळला गेला, तर हा केवळ प्रकल्प नसेल—तो शासनाच्या शब्दाला आलेली प्रतिष्ठा असेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *