मावळातील 16 गावांमध्ये दरडप्रवण क्षेत्रात उपाययोजनांसाठी 39 कोटींचा निधी उपलब्ध – आमदार शेळके

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑक्टोबर ।। वडगाव मावळ ।। आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत मावळ तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रात उपाययोजना करण्यासाठी सुमारे ३८ कोटी ९३ लक्ष निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिली.

आमदार सुनिल शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करून मिळविलेल्या या निधीतून दरड प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक भिंत बांधणे आणि अन्य उपाययोजनांचा समावेश आहे. ही कामे झाल्यानंतर अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळून दिलासा मिळणार आहे.

वाउंड, वडेश्वर, फळणे, मालेवाडी, वाकसई – देवघर, आतवण, साई, वाकसाई, शिलाटणे, पांगळोली, पाटण भाजे, मोरवे, वेहेरगाव, तुंग या गावांत दरड राखून ठेवणारी भिंत बांधणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

आमदार सुनिल शेळके यांनी पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध केला आहे. मावळातील अति दुर्गम भागात नैसर्गिक आपत्तीमुळे जीवितहानी व वित्तहानी होण्याबरोबरच जनजीवन विस्कळीत होत असते. या समस्येवर उपाययोजना होणे गरजेचे होते. आमदार शेळके यांच्या दूरदृष्टीतून आपत्ती निवारणाचे हे कार्य मावळवासीयांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे आमदार शेळके यांनी मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *