महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑक्टोबर ।। देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत सप्टेंबरमध्ये वार्षिक तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मासिक तुलनेत म्हणजे ऑगस्टच्या तुलनेत मात्र, त्यात अल्प वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ‘ईव्हीं’चे प्रमाण १९ टक्क्यांनी वाढले आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये एकूण १.४९ लाख ‘ईव्ही’ विक्री झाली असून, सप्टेंबर २०२३ मधील १.१९ लाखांवरून ती २५ टक्क्यांनी वाढली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये नोंदवलेल्या १.४७ लाख वाहनांपेक्षा त्यात अल्प वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ८८ हजार १५६ इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली असून, गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ती ६३ हजार होती, तर ऑगस्ट २४ मध्ये ८७ हजार दुचाकींची विक्री झाली होती.
दुचाकींच्या विक्रीत ४० टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये ५४ हजार इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांची नोंदणी झाली. सप्टेंबर २०२३ मध्ये ती ४९ हजार होती, तर ऑगस्ट २०२४ मध्ये ५२ हजार होती. ओला इलेक्ट्रिकच्या २३,९६५ दुचाकींची विक्री झाली, ऑगस्टमध्ये २६,९२८ वाहनांची विक्री झाली होती, त्या तुलनेत विक्रीत घट होऊनही इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेमध्ये ती या विभागातील प्रथम क्रमांकाची कंपनी ठरली.
तीनचाकी वाहनांमध्ये महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटीने सप्टेंबरमध्ये ५०३० वाहनांची विक्री केली, ऑगस्टमध्ये हे प्रमाण ४२६३ होते. बजाज ऑटोने सप्टेंबरमध्ये ४५९६ तीनचाकी वाहनांची विक्री केली. प्रवासी मोटारी आणि ‘एसयूव्हीं’ची विक्री ऑगस्टमधील ६५७० वाहनांवरून सप्टेंबरमध्ये ५७०६ पर्यंत घसरली.
पहिल्या सहामाहीत ८.३७ लाख वाहनविक्री
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, सर्व विभागातील एकूण ‘ईव्हीं’ची विक्री गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ७.०२ लाख वाहनांच्या तुलनेत ८.३७ लाखांवर गेली आहे. सप्टेंबर २०२४ अखेर संपलेल्या सहामाहीसाठी इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री मागील वर्षीच्या याच कालावधीतील ४२,४०६ वाहनांच्या तुलनेत सुमारे ४२,८०६ वाहनांपर्यंत वाढली.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील मजबूत कामगिरीमुळे ही वाढ झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची विक्री २२,७४९ पर्यंत वाढली. पहिल्या तिमाहीत हे प्रमाण २०,९३२ होते. मागील आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील २१,४७४ वाहनांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत २०,९३२ वाहनांची विक्री झाली.