Pune Helicopter Crash: उड्डाणानंतर ४ मिनिटांत कोसळलं हेलिकॉप्टर ; अक्षरश: तुकडे… अपघात नेमका कसा झाला?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑक्टोबर ।। पुण्यामध्ये बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. पुण्यातील बावधन बुद्रुक गावाच्या हद्दीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जात असलेले हे हेलिकॉप्टर अचानक कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला.

असा झाला अपघात –
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात होते. या परिसरामध्ये मोठ्याप्रमाणावर धुके होते. धुक्यामुळे अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोसळले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनने लगेच पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या दोन पायलट आणि इंजिनिअरचा मृत्यू झाला. त्याचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. मृतदेहांची अवस्था ओळखण्यापलीकडे गेली होती. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आलेत.

या कंपनीचे होते हेलिकॉप्टर –
हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर पुण्यावरून मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते. मात्र मुंबईत पोहण्यापूर्वीच आणि उड्डाण घेतल्याच्या अवघ्या तिसऱ्या मिनिटाला अपघात झाला. सुनील तटकरे यांनी मंगळवारी ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता.

सुनील तटकरेंना नेण्यासाठी येत होते हेलिकॉप्टर –
सुनील तटकरे मंगळवारी या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. तिथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परत आले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून सुनील तटकरे हे मुंबईला आले होते. सुनील तटकरे आज पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. सुनील तटकरे यांना नेण्यासाठीच हे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने येत होते. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी पावणे सातच्या सुमारास उड्डाण घेतले होते. पण अवघ्या ४ मिनिटांत त्यानंतर हे हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले.

मृतांची ओळख पटली –
ऑगस्टा 109 असे या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे नाव होते. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांची ओळख पटली आहे. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत पायलटची नावं आहेत. तर प्रीतम भारद्वाज असं मृत्यू झालेल्या इंजिनिअरचे नाव आहे. राज्यात येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला सुरु होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांना हे हेलिकॉप्टर भाडेतत्त्वार दिले जाणार होते, अशीही माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *