महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑक्टोबर ।। राज्यात परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दणका दिला आहे. त्यामुळे परतीचा पाऊस चांगलाच धुमाकूळ घालणार अशी चिन्हे दिसत होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. तसेच परतीच्या पावसाचा जोर ओसरल्याने उन्हाचाही चटका जाणवत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
राज्यात कमाल तापमानात वाढ होत ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला आहे. तापमानाचा पारा ३६ अंशांच्याही पुढे गेला आहे. यातच दुपारनंतर वादळी वाऱ्यासह परतीचा पाऊस कोसळत आहे. आज (ता. ४) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच पुणे, सातारा, नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, सध्या राज्यभरात पावसाने उसंत घेतल्याने उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार असून नागरिकांना ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागणार आहे. सध्या पहाटेच्या धुके आणि दव पडत असल्याचे चित्र आहे. सकाळपासून उकाडा वाढत असून, दुपारनंतर वळीव पावसाचे ढग दाटून येत वादळी पाऊस हजेरी लावत आहे.