महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – ता. २७ जुलै – मराठा आरक्षण प्रकरणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. तीनच दिवसात ही सुनावणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याचं सुप्रीम कोर्टात काय होणार या उत्तरासाठी आता फार प्रतीक्षा करावी लागणार नाही.

सुप्रीम कोर्टात 15 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत कोणताही अंतरिम आदेश किंवा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिली नाही. मात्र मराठा आरक्षणावरच्या अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली. 27 जुलैपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होईल आणि केवळ तीन दिवसांतच सुप्रीम कोर्ट या सुनावणीचा निपटारा करणार आहे. दीड दिवस याचिकाकर्त्यांना तर दीड दिवस दुसऱ्या बाजूला युक्तिवादासाठी मिळणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातल्या मराठा आरक्षणाला विरोध करत याचिका कोर्टात दाखल आहे. येत्या जुलै अखेरीस ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आहे. पण 15 जुलै रोजीही मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला. 70 ते 75 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण झाली असल्याचं काही वकिलांनी नमूद केलं. मराठा आरक्षणाच्या प्रकरणाने महाराष्ट्राचं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण ढवळून निघालं होतं. या प्रकरणाचा राजकीयदृष्ट्याही परिणाम होणार आहे. त्यामुळेच आता याबाबत सुप्रीम कोर्टात काय निकाल लागतो हे अत्यंत महत्वाचं असणार आहे.