महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ता. २७ जुलै – खजुरापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार होतात. अनेक लोकं खजुराची वडी, खजुरापासून तयार करण्यात आलेली मिठाई आवडीने खातात. मात्र, खजूर खाण्याचे अजूनही काही फायदे आहेत. खजूर खाल्ल्यामुळे आपण अनेक रोगांपासून आपला बचाव करू शकतो. खजुरात असलेल्या काही औषधी गुणधर्मांमुळे खजूर आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणूनच नियमित खजूर खाण्याचे फायदे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हे आहेत नियमित खजूर खाण्याचे फायदे-
ताकद वाढवण्यासाठी फायदेशीर
एक खजूर नियमित खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात ताकद वाढते. ज्यामुळे आपण रोगांचा सामना करू शकतो. तसेच यामुळे आपल्या शरीराचा विकास उत्तम पद्धतीने होतो. खजुरात व्हिटॅमिन ए, बी-1, बी-2, बी-3 आणि बी-5 यांचे प्रमाण असते. तसेच व्हिटॅमिन सी खजुरात असते. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच आपला थकवा दूर होतो. त्यामुळे लहान मुलांसाठी खजूर अत्यंत पौष्टिक आहेत.
शरीरात वाढते रक्ताचे प्रमाण
आजकाल बहुतांश जणांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते ज्यामुळे त्यांना अनेक आजार जडतात. मात्र यासाठीही खजूर हाच रामबाण उपाय आहे. खजुरात असलेल्या लोहाच्या म्हणजेच आयरनच्या प्रमाणामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत मिळते. महिलांनाही खजूर खाण्यामुळे अनेक प्रकारचे फायदे होतात.
मेंदूचा होतो विकास
खजुरात पोटॅशियम आणि सोडियम या पोषक द्रव्यांचे मुबलक प्रमाण असते. ज्यामुळे आपल्या मेंदूचा विकास उत्तम पद्धतीने होतो. तसेच लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही खजूर कामात येते. लहान मुलांना रोज एक खजूर दिल्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते.
मधुमेहींसाठी उपयुक्त
खजूरात अनेक प्रकारचे पोषक पदार्थ असतात. मॅंगनीज, लोह, फॉस्फरस, तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचे प्रमाण खजुराच्या असते त्यामुळे मधमेहींसाठी खजूर पौष्टिक असते.
पचनक्रिया राहते उत्तम
एक ते दोन खजूर रोज रात्री पाण्यात भिजवून खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया उत्तम राहते. तसेच पोटाचे अनेक विकार खजुराच्या सेवनामुळे दूर होतात. लहान मुलांच्या पोटाच्या समस्याही खजुरामुळे दूर होतात.
खजुरापासून बनलेले पदार्थ खाणे लाभदायी
अनेक लहान मुलांना खजूर आवडत नाही. त्यामुळे जर त्यांना खजुराची बर्फी, खजुराचा मिल्कशेक, खजुराची मिठाई, खजुराचे चॉकलेट असे नवनवीन पदार्थ दिले तर त्यांची प्रकृती चांगली राहण्यास मदत होईल.
