Maharashtra Politics : महायुतीला शरद पवारांचे धक्क्यावर धक्के; पाटील, घाटगेंनंतर आता शिंदे तुतारी घेणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०४ ऑक्टोबर ।। राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हर्षवर्धन पाटील आणि समरजीत घाटगे यांनी शरद पवारांना साथ दिली आहे. त्यानंतर पंढरपुरातील बडा नेता तुतारी फुंकणार आहे. त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे अजित पवारांची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे.

माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे हे अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे हे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. रणजितसिंह शिंदे हे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र आहेत. बबनराव शिंदे यांनी शरद पवारांकडे उमेदवारीची मागणी केली होती. त्यानंतर आज बबनराव शिंदे यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. बबनराव शिंदे यांच्या भूमिकेने माढ्यात अजित पवार यांच्यासह महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

आमदार बबनराव शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटलं की, ‘ दादा, तुम्ही ३८ वर्षे शरद पवारांसोबत काम केलेय. दोन वर्षांपासून तुम्ही साहेबांपासून दूर गेला आहात. तुम्ही कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार साहेबांना भेटून आलो. तिकिट मिळेल की नाही माहिती नाही. पण आगामी निवडणुकीमध्ये साहेबांनी रणजितला तिकिट दिले तर ठीक. नाहीतर मी त्याला अपक्ष उभं करणार आहे’.

दरम्यान, आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बबनराव शिंदे हे तुतारी फुंकणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. अशातच बबनराव शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून माघार घेत सुपुत्रासाठी मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुलाला आमदारकीचं तिकीट मिळावं, यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचे बबनराव शिंदे यांनी जाहीर केले. त्यानंतर शरद पवारांनी तिकीट दिलं तर ठिक, नाहीतर अपक्ष उभ करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बबनराव शिंदे यांच्या नव्या भूमिकेमुळे माढ्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *