महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑक्टोबर ।। पुण्यामध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या घटना वाढत चालल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे सतत दिसून येत आहेत. पुण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर याच ठिकाणी एका तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला होता.
तर पुण्याच्या वानवडीमध्ये दोन शाळकरी मुलींवर स्कूलव्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले. या तिन्ही घटनेमुळे पुणे हादरले आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्याच्या सात महिन्यामध्ये २५६ बलात्काराच्या घटना तर ४५० विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात या वर्षातील फेब्रुवारी ते आतापर्यंत या सात महिन्यात २५६ बलात्काराच्या आणि ४५० विनयभंगाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. महिला आणि मुला-मुलींच्या सुरक्षेतेसाठी पुणे पोलिसांकडून दामिनी पथक, पोलीस काका, पोलीस दीदी आधी उपक्रम राबवले जात आहेत. तरीही दर महिन्याला बलात्काराच्या सरासरी ३८ तर विनयभंगाचे ६५ गुन्ह्याची पोलिसांकडून नोंद आहे. त्यामुळे पुणे सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण होतो.
पुण्यातील अत्याचाराच्या घटना –
– ऑगस्ट महिन्यामध्ये ३७ बलात्कार आणि ६० विनयभंगाच्या घटना घडल्या.
– जुलै महिन्यामध्ये ३९ बलात्कार आणि ४४ विनयभंगाच्या घटना घडल्या.
– जून महिन्यामध्ये ३५ बलात्कार आणि ६२ विनयभंगाच्या घटना घडल्या.
– मे महिन्यामध्ये ३७ बलात्कार आणि ६५ विनयभंगाच्या घटना घडल्या.
– एप्रिल महिन्यामध्ये ३६ बलात्कार आणि६६ विनयभंगाच्या घटना घडल्या.
– मार्च महिन्यामध्ये ३९ बलात्कार आणि ८५ विनयभंगाच्या घटना घडल्या.
– फेब्रुवारी महिन्यामध्ये ४२ बलात्कार आणि ६८ विनयभंगाच्या घटना घडल्या.