महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑक्टोबर ।। बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाची आवक होत नाही. त्यामुळे गव्हासह त्यापासून तयार होणाऱ्या रवा, मैदा आणि आट्याच्या दरात वाढ झाली आहे. येत्या काळात सण आणि उत्सव असल्यामुळे ही दरवाढ कायम राहणार असल्याचा अंदाज मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.
घाऊक बाजारात रवा, मैदा आणि आट्याच्या दरात मागील पंधरा दिवसांच्या तुलनेत क्विंटलच्या दरात सुमारे ३०० ते ४००० रुपयांची वाढ झाली आहे. तर किरकोळ बाजारात किलोच्या दरात ५ ते ६ रुपयांनी वाढ झाली आहे.
दिवसेंदिवस या पदार्थांच्या दरात वाढ सुरूच आहे. शिल्लक गव्हाचे प्रमाण कमी असल्याने वाढलेल्या दरात घट होण्याची शक्यता नाही. उलट जोपर्यंत नवीन गहू बाजारात दाखल होणार नाही, तोपर्यंत दरात वाढच होत राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत भुसार विभागात रवा, मैदा आणि आट्याच्या रोज २० ते २५ ट्रकची आवक होत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवीन गहू बाजारात दाखल होण्यास सुरुवात होत असते. तोपर्यंत शिल्लक असलेल्या जुन्या गव्हावर सर्वांना अवंलबून राहावे लागणार आहे. एकूण परिस्थिती पाहता नवीन गहू बाजारात दाखल होईपर्यंत रवा, मैदा आणि आट्याचे दर अधिक असल्याचेही सुमीत गुंदेचा यांनी सांगितले.
विविध राज्यातून आवक…
मार्केट यार्डातील भुसार विभागात पुण्यासह मध्य प्रदेशातून रवा, मैदा आणि आट्याची आवक होत असते. बाजारात राज्यासह पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून गव्हाची आवक होत असते. मात्र, या राज्यात शिल्लक गव्हाचे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत ग्राहकांकडून मागणी अधिक होत आहे. त्यातच नवरात्र, दसरा आणि दिवाळीमुळे गव्हासह रवा, मैदा आणि आट्याची मागणी वाढणार आहे.
दरवाढ का ?
उत्पादित राज्यात गव्हाचा साठा कमी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी जास्त
नवीन गहू बाजारात दाखल होण्यास चार महिन्यांचा वेळ
सणामुळे रवा, मैदा आणि आटा या पदार्थांना मागणी
घाऊक बाजारातील ५० किलोचे दर
मैदा
पंधरा दिवसांपूर्वीचा दर
१६०० ते १९००
आताचा दर
१८०० ते २१००
रवा
पंधरा दिवसांपूर्वीचा दर
१६०० ते १८००
आताचा दर
१८०० ते २०००
आटा
पंधरा दिवसांपूर्वीचा दर
१६०० ते १८००
आताचा दर
१८०० ते २०७५