महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ ऑक्टोबर ।। महाराष्ट्राचा सगळा खेळ झाला आहे. कोणी विदुषक चाळे करताय, कोण मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारताय अशी टीका राज ठाकरेंनी पुण्यात बोलताना केली. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण संपन्न झाले. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांवर बोचरी टीका केली. त्याशिवाय साहित्यिक यांनी राजकारण्यांना आरसा दाखवण्याची गरज असल्याचेही सांगितले.
राजधानी दिल्लीमध्ये होणाऱ्या ९८ व्या अकिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज पुण्यात राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. मराठीच्या अभिजात दर्जाच्या अनुषंगाने राज ठाकरेंनी यावेळी साहित्यिकांशी संवाद साधला. त्याशिवाय राजकीय नेत्यांवर बोचरी टीका केली. तसेच माध्यमांवरही गंभीर आरोप केला.
नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका –
महाराष्ट्राचे राजकीय भाषा इतक्या खालच्या थराला गेली आहे, त्यांना समजावणारे कोणी नाही. ज्यांना बुजुर्ग म्हणावं तेच त्याच्या आहारी गेले आहेत. ज्या तरुणांना राजकारणात यावं वाटतंय त्यांना वाटतंय की ही भाषा म्हणजे राजकारण आहे. महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त अध:पतन होण्याचं श्रेय कोणाचा असेल तर ते माध्यमांचा आहे. लोक वाटेल ते बोलतात ते हे दाखवतात. जेव्हा हे दाखवणे बंद करतील तेव्हा हे बंद होईल, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
काय म्हणाले राज ठाकरे ?
माझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण मी करणार आहे. कारण साहित्यिक यांच्यासमोर आम्ही काय बोलणार? त्यांच्यासमोर बोलायचं नाही, ऐकायचं असतं, असे राज ठाकरे म्हणाले. प्रत्येक लेखक, कवी यांच्या मनात मराठी बाणा असायचा, तो हा बाणा राजकीय नेत्यांना ठासून सांगितलेलं आता दिसत नाही. सध्या राजकारणात अनेक नेते आहेत, ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीतून उड्या मारायला लावल्या पाहिजेत, असा चिमटा ठाकरेंनी काढला.
मी माझ्याबद्दल होत असलेल्या गोष्टी सोशल मीडियावर कधी पाहायला जात नाही. मला वाटतं साहित्यिकांनी त्यांनी केलेल्या ट्रोलिंगचा विचार करू नये. महाराष्ट्रातील राजकारणातील भाषा खालच्या स्तरावर गेली आहे. साहित्य संमेलन येत राहतील पण भाषा सुधरावण्याचे सामाजिक चळवळ उभी करणं गरजेचं आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.