महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑक्टोबर ।। विकासाच्या मागे उभा राहायचं की नाही याबाबतचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या परिवाराने घ्यायचा आहे. बारामतीने माझ्यावर 33 वर्षे प्रेम केलं. बारामतीकरांच्या जोरावर मी राज्यभर सक्षमपणे फिरु शकलो. विविध पदांवर मी बसू शकलो. या ही निवडणूकीला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा रहाल याबाबत शंका नाही. काहीजण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Ajit Pawar) यांनी केलं. अजित पवारांच्या उपस्थितीत सोमवारी व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बारामतीतील जिजाऊ भवन येथे हा मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील- अजित पवार
पूर्वी पवारांकडून जेवणं मिळत नव्हती. काहीच मिळत नव्हतं. पवार भेटायलाही येत नव्हते. कुठे काय झालं तर मी कधीतरी भेटायचो. आता शहरात लोक फिरायला लागली, घमेली वाटायला लागली. साड्या वाटायला लागली. असं सगळं व्हायला लागलं आहे. त्या निमित्ताने पवार घरी यायला लागले हे बरं झालं ना…आता नावं माहित नसलं तरी मी ओळखते तुम्हाला……ओळखते… तुम्हाला. कधी नव्हे तो अजित पवारही हसायला लागलाय. मिळतयं ते घ्या, सोडू नका पण घड्याळाला मतदान करा…तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील, असं मोठं विधानही अजित पवारांनी केलं. पुन्हा मला येता येणार नाही. मला राज्यात फिरावं लागणार आहे. आता तुमची सर्वांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडा, असे निर्देशही अजित पवारांनी दिले.
