श्री क्षेत्र नृसिंहवाडीत वृद्ध भाविकांना दर्शन होणार सोपे, मंदिराकडे जाणाऱया दगडी पायऱ्यांची उंची केली कमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑक्टोबर ।। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त दर्शनासाठी भाविकांची दररोज मोठी गर्दी होते. घाटावरून मंदिराकडे जाणाऱ्या घाटावरील पायऱ्यांची उंची जास्त असल्यामुळे वृद्ध आणि महिला भाविकांना जाण्यात अडचण निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर दत्त देवस्थानने या पायऱ्यांची उंची कमी करून ती अर्धा फूट केल्यामुळे आता वृद्ध भाविकांना देवाचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे.


श्री दत्त प्रभूंची राजधानी म्हणून ओळख असलेल्या शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त दर्शनासाठी भाविकांची दररोज मोठी गर्दी होते. ‘श्रीं’च्या दर्शनासाठी मंदिराकडे जाणाऱ्या घाटावरील दगडी पायऱ्यांवर मोठी गर्दी असते. या घाटावरील जुन्या दगडी पायऱ्या एक फूट उंचीच्या आहेत, त्यामुळे वृद्ध भाविक आणि महिलांना या पायऱ्या चढ-उतार करताना दमछाक होत होती. तसेच उत्सवकाळात भाविकांना दर्शन घेताना चेंगराचेंगरीसह अनेक अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी, सचिव संजय उर्फ सोनू पुजारी व पदाधिकाऱ्यांनी या घाटावरील एक फुटाच्या 35 पायऱ्यांची उंची कमी करीत ती अर्धा फूट केली आहे. त्यामुळे महिला आणि वयस्कर भाविकांना ये-जा करणे शक्य होणार आहे. येत्या 12 ऑक्टोबर रोजी दसरा महोत्सव सोहळ्यादिवशी नवीन बांधण्यात आलेल्या दगडी पायऱ्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी यांनी सांगितले.

साधारण 1434 मध्ये दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी आपल्या पादुका येथे ठेवून गाणगापूरला प्रयाण केले. त्यानंतर या मंदिराचा विकास होत गेला. त्यातील एक टप्पा म्हणजे 57 पायऱ्यांचा समांतर घाट संत एकनाथांनी बांधला. दर्शनप्रक्रियेत पायऱ्यांना आणि घाटांना विशेष महत्त्व आहे. हा धागा पकडून पुण्याचे उद्योजक विजय कुलकर्णी यांनी पायरी बांधकामासाठी 70 लाख रुपये देणगीच्या रूपात दिले. पूर्वीच्या पायऱ्या एक फुटाच्या होत्या. आताच्या पायऱ्या अर्ध्या फुटाच्या झाल्यामुळे भाविकांना चढणे-उतरणे सोयीस्कर होणार आहे. नवीन पायऱ्यांवरून पाय घसरू नये, यासाठी काही जुन्या पद्धतीच्या मजुरांकरवी ते दगड छिन्नीने फुलवल्या आहेत. जुन्या पायऱ्यांबरोबर याही पायऱ्यांचा वापर भाविकांसाठी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *