महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडने केन विल्यमसनला 17 सदस्यीय संघात स्थान दिले असले तरी कसोटी मालिकेत खेळणे त्याच्यासाठी कठीण दिसते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे केन भारत दौऱ्यावरही संघासोबत येत नाहीये. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत टॉम लॅथम न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करणार आहे. श्रीलंकेत संघाच्या खराब कामगिरीनंतर टीम साऊदीच्या जागी लॅथम कर्णधार बनला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 16 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे.
केन विल्यमसनशिवाय न्यूझीलंडचा संघ भारतात येणार
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या कसोटी संघाची घोषणा करताना केन विल्यमसन आणि संघाच्या वेळापत्रकात मोठा अपडेट दिला आहे. त्यांनी सांगितले की.” किवी संघ शुक्रवारी म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी भारत दौऱ्यावर जाणार आहे. पण, या दौऱ्यात केन विल्यमसनच्या फ्लाइटला विलंब होऊ शकतो. न्यूझीलंड क्रिकेटने यामागे विल्यमसनच्या मांडीच्या दुखापतीचे कारण सांगितले.”
केन विल्यमसनला भारताविरुद्धच्या कसोटीत खेळणे कठीण
श्रीलंकेविरुद्ध गाले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केन विल्यमसनच्या मांडीला दुखापत झाली. न्यूझीलंड क्रिकेटच्या मते, “तो सध्या पुनर्वसनात आहे, त्यामुळे तो संघातील उर्वरित खेळाडूंसोबत जाणार नाही.” याचाच अर्थ बेंगळुरूमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटीत केन विल्यमसनच्या खेळण्याची फारशी आशा नाही. पण, कसोटी मालिकेतील त्याच्या पुढील खेळाबद्दल अद्याप काहीही सांगता येणार नाही. कारण, तो मांडीच्या दुखापतीतून कधी बरा होईल, याबाबत कोणतीही माहिती नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने नुकतीच भविष्यातील सामन्यांसाठी तो बरा होण्याची आशा व्यक्त केली आहे.