महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ता. २८ जुलै – पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांमध्ये निकालाची तारीख ठरणार असून, 31 जुलैच्या आतमध्येच निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळातील सूत्रांनी दिली आहे.
राज्य मंडळाकडून फेब—ुवारी-मार्च महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेतल्यानंतर, इयत्ता बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस, तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो. यंदा मात्र कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुमारे दोन महिने रखडली. याचा परिणाम निकालावर झाला असून, निकाल दीड ते दोन महिने उशिरा जाहीर होत आहेत. त्यातच 16 जुलै रोजी बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे डोळे दहावीच्या निकालाकडे लागले आहेत.
कोरोनाचा प्रकोप सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कोरोना विषाणूमुळे दहावीचा शेवटचा पेपरही होऊ शकला नाही. भूगोलचा शेवटचा पेपर बाकी असताना कोरोनाचा कहर वाढू लागला. अखेर हा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीने विद्यार्थ्यांना गुण दिले जाणार आहेत. दहावीच्या परीक्षेला यंदा 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते. बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर दहा दिवसांच्या आत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येतो. त्यामुळे 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकाल नेमका कधी जाहीर होणार याची विद्यार्थी, पालकांकडून विचारणा होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 किंवा 31 जुलै रोजी निकाल जाहीर करण्यासाठी मंडळ प्रयत्नशील आहे. मात्र, याबाबत मंडळाकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसून, महिनाअखेरपर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे मंडळामार्फत सांगण्यात आले आहे. गेल्यावर्षी दहावीचा निकाल 8 जून 2019 रोजी जाहीर झाला होता. मात्र, यंदा कोरोनामुळे निकालास उशीर झाल्याचे दिसून येत आहे.