महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑक्टोबर ।। तुळजापुरात तुळजाभवानी देवीच्या दारात VIP घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय.मंदिरातील पुजारी मंडळानेच मंदिरात व्हिआयपी दर्शनासाठी पोलिस पैसे घेत असल्याचा आरोप केलाय. साम टीव्ही ने विस्तृत बातमी दिली आहे .
देवीच्या दरबारात पैसे कमावण्याचा धंदाच सुरू केलाय. पैसे द्या आणि लवकर दर्शन घ्या. हे सध्या सुरू आहे तुळजाभवानीच्या दारात. भाविक श्रद्धेनं देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरात येत असतात. मात्र, व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली पोलिसच भक्तांकडून पैसे घेत असल्याचा आरोप पुजारी मंडळाने केलाय. पुरावा म्हणून त्यांनी व्हिडिओच समोर आणलाय.
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होतायत. याठिकाणी व्हीआयपी पास देखील उपलब्ध आहेत. मात्र या व्हीआयपी पासमध्ये पोलिसांकडून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी केलाय.
तुळजाभवानीत VIP घोटाळा?
व्हिआयपी दर्शनासाठी 300 ते 500 रुपयांचा पास
घोटाळा करणारे पैसे घेऊन VIP पास देतात
दर्शनापूर्वी पास फोटो काढून स्कॅन करायचा असतो
स्कॅनर बंद ठेवल्याने पास पुन्हा वापरता येतो
भक्तांकडून पास जमा करून पुन्हा वापर
अशा प्रकारे हा घोटाळा असल्याचा आरोप करण्यात आलाय.त्यामुळे सामान्य भाविक हैराण झालेयत. रांगेतून जाणाऱ्या भाविकांना 6 ते 7 तास लागत असल्याने व्हीआयपी दर्शन पास बंद करा, अशी मागणी भाविकांकडूनही केली जातेय. पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश प्राप्त होताच त्यासंबंधी कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार यांनी दिलीय.