महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑक्टोबर ।। देशातील जुन्या आणि अत्यंत प्रतिष्ठित अशा टाटा समूहाच्या नेतृत्त्वाची धुरा अनेकवर्षे समर्थपणे सांभाळणाऱ्या आणि आपली जीवनशैली, राहणीमान आणि सामाजिक वावर या सगळ्यातून आदर्शतेच्या मूल्याचे नवे मापदंड रचणारे उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारताच्या उद्योग क्षेत्रातील एका पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक आणि उद्योजक क्षेत्रातून शोकाकुल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
भारतीय बँकाचे अनेक कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेला उद्योजक विजय माल्ल्या (Vijay Mallya) यानेही रतन टाटा यांच्या निधनानंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. परदेशात फरार झाल्यापासून विजय माल्ल्या क्वचितच भारतातील घडामोडींवर भाष्य केले आहे. मात्र, रतन टाटा यांच्या निधनानंतर विजय माल्ल्याने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये माल्ल्याने म्हटले आहे की, रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दु:ख झाले. रतन टाटा हे प्रतिष्ठेचा आणि संयमी वृत्तीचा मेरुमणी होते. त्यांनी देशातील सर्वात मोठ्या उद्योजक घराण्याची धुरा समर्थपणे सांभाळली, असे विजय माल्ल्या याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Very sad to hear of the passing away of Mr Ratan Tata. He was the epitome of dignity and grace at all times even whilst successfully leading India’s largest Industrial House. RIP Sir.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) October 9, 2024
रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या घरी नेण्यात आले आहे. याठिकाणी त्यांचे कुटुंबीय त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतील. यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सर्वसामान्य लोकांना रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी त्यांचे पार्थिव नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस (NCPA)येथे आणण्यात येईल. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव एनसीपीए येथे ठेवण्यात येईल. यानंतर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.