महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑक्टोबर ।। पाकिस्तान आणि इंग्लंडमधील पहिला कसोटी सामना सुरू आहे. मुल्तानमध्ये सुरु असलेल्या या कसोटी सामन्यात चार दिवसात तब्बल १५०० धावा निघाल्यात. पाटा पिचमुळे गोलंदाजांचा घाम निघालाय. पाकिस्तान संघाने ५५६ धावा केल्यावर इंग्लंडने ८२३-७ धावा करत आपला डाव घोषित केला. त्यानंतर दिवस संपता संपता पाकिस्तानच्या १५२-६ विकेट गेल्या असून त्यांच्यावर पराभवाचं सावट आहे. पाचव्या दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी चार विकेट घ्यायच्या असून अद्यापही त्यांच्याकडे ११५ धावांची आघाडी आहे. पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांची खरी कसोटी असणार आहे. नाहीतर पहिल्या डावात ५५६ धावा करूनही पाकिस्तानचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे. इंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा पक्का घाम काढला, चौथ्या दिवसाची सुरूवात झाल्यावर पाकिस्तानचा एका खेळाडू मैदानात उतरू शकला नाही. कारण त्याला थेट रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
कोण आहे तो खेळाडू?
पाकिस्तानच्या या आजारी पडलेल्या खेळाडूचे नाव अबरार अहमद आहे. अहमद याने ३५ ओव्हर टाकल्या यामध्ये त्याने १७४ धावा बहाल केल्या. मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. चौथ्या दिवशी सकाळी अहमद याला थंडीताप आला होता आणि त्याला खूप वेदनाही होत होत्या. त्यामुळे त्याला त्वरित रूग्णालयात हलवण्यात आलंय. त्याच्या अनेक चाचण्याही झाल्या
असून रिपोर्ट येणं बाकी आहे. त्याआधी इंग्लंडच्या जो रूट आणि कॅप्टन हॅरी ब्रूक यांनी केलेल्या दमदार फलंदाजीने पाकिस्तानच्या गोलंदाजीचे पिसे काढलीत.
जो रूटने ३७५ चेंडूंमध्ये २६२ धावा केल्या यामध्ये त्याने १७ चौकार मारले. तर हॅरी ब्रूक याने ३२२ चेंडूत ३१७ धावांची त्रिशतकी खेळी केली, यामध्ये त्याने २९ चौकार आणि ०३ षटकार मारले. दोघांनाही अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. जो रूट इंग्लंडचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. रूटने १२,६४४ धावा केल्या असून जगातील सर्वाधिक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी पोहोचला आहे. त्यासोबतच इंग्लंडकडून कसोटीमध्ये सर्वाधिक ३५ शतके करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केलाय.
