महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑक्टोबर ।। पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवत पाहुण्या इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. यजमान पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ५५६ धावा करुन देखील त्यांना एक डाव आणि ४७ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडकून हॅरी ब्रूकने त्रिशतक तर जो रुटने द्विशतकी खेळी केली. पाकिस्तान क्रिकेट संघाला आपल्या घरच्या मैदानावर मोठ्या कालावधीपासून एकही सामना जिंकता आला नाही आणि ती परंपरा अद्याप कायम आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्या डावात ५५० हून अधिक धावा करुनही पराभव स्वीकारणारा पाकिस्तान आशियाईतील पहिला संघ ठरला आहे.
पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ५५६ धावा केल्याने यजमान संघाच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. मात्र, पाहुणा इंग्लिश संघ फलंदाजीला आला अन् होत्याचे नव्हते झाले. अचानक सामन्याचे चित्र बदलू लागले. हॅरी ब्रूकची त्रिशतकी खेळी आणि जो रुटच्या द्विशतकाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी झाली. एकूणच इंग्लंडच्या फलंदाजांच्या तुलनेत पाकिस्तानी खेळाडूंचा अनुभव आणि फिटनेस तोडका पडला. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ७ बाद ८२३ धावा करुन २६७ धावांची आघाडी घेतली. या आघाडीच्या जोरावर इंग्लिश संघाने चौथ्या दिवशी डाव घोषित केला आणि पाचव्या दिवसातील पहिल्याच सत्रात सामना आपल्या नावावर केला.
चौथ्या दिवशी इंग्लंडने २६७ धावांची आघाडी घेऊन डाव घोषित केला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने ३२२ चेंडूत २९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३१७ धावा कुटल्या. तर, जो रुट (२६२), बेन डकेट (८४), जॅक क्रॉली (७८), जेमी स्मिथ (३१) आणि ख्रिस वोक्सने नाबाद १७ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानी गोलंदाजांना चांगलाच संघर्ष करावा लागला. यजमान संघाकडून नसीम शाह आणि सैय अयुब यांनी २-२ बळी घेतले, तर शाहीन आफ्रिदी, आमिर जमाल आणि अघा सलमान यांना प्रत्येकी १-१ बळी घेता आला.
पाकिस्तानचा दुसरा डाव
बराच वेळ धुलाई केल्यानंतर अखेर इंग्लंडने डाव घोषित करताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी सुटकेचा निश्वास सोडला. मग लगेचच त्यांना फलंदाजीसाठी यावे लागले. थकलेल्या पाकिस्तानी खेळाडूंची इंग्लंडच्या गोलंदाजांनी देखील वाट लावली. सलामीवीर अब्दुला शफीक खातेही न उघडता तंबूत परतला. मग सैय अयुब (२५), शान मसूद (११), बाबर आझम (५) आणि सौद शकील (२९) बाद झाला. चौथ्या दिवसअखेर पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या डावात ३७ षटकांत ६ बाद १५२ धावा केल्या होत्या. शेजाऱ्यांचा संघ या घडीला ११५ धावांनी पिछाडीवर होता. सलमान अली अघा (नाबाद ४१) आणि आमिर जमाल (नाबाद २७) हे चौथ्या दिवसअखेर खेळपट्टीवर टिकून होते. पण, अखेरच्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात पाकिस्तानचा संपूर्ण संघ गारद झाला. पाकिस्तान दुसऱ्या डावात ५४.५ षटकांत अवघ्या २२० धावा करू शकल्याने त्यांना ४७ धावांनी पराभव पत्करावा लागला.
पाकिस्तानचा पहिला डाव
तत्पुर्वी, पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात १४९ षटकांत ५५६ धावा केल्या. पाकिस्तानकडून अब्दुला शफीक (१०२), सैय अयुब (४), शान मसूद (१५१), बाबर आझम (३०), सौद शकील (८२), नसीम शाह (३३), मोहम्मद रिझवान (०), अघा सलमान (नाबाद १०४), आमिर जमाल (७), शाहीन आफ्रिदी (२६) आणि अबरार अहमदने (३) धावा केल्या. फलंदाजांना मदतशीर असलेल्या खेळपट्टीवर पाकिस्तानी फलंदाजांनी चांगली खेळी केली. इंग्लंडकडून जॅक लीचने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर गस एटकिंसन आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. याशिवाय ख्रिस वोक्स, शोएब बशीर आणि जो रुट यांना १-१ बळी घेता आला.
पाकिस्तानचा संघ –
शान मसूद (कर्णधार), सैय अयुब, अब्दुला शफीक, बाबर आझम, सौद शकील, नसीम शाह, मोहम्मद रिझवान, अघा सलमान, आमिर जमाल, शाहीन शाह आफ्रिदी, अबरार अहमद.
इंग्लंडचा संघ –
ओली पोप (कर्णधार), बेन डकेट, जॅक क्रॉली, जो रुट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, ब्रायडन कार्स (पदार्पण), जॅक लीच, शोएब बशीर.