महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ ऑक्टोबर ।। राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केलेल्या मविआने शिंदे गट तसेच अजित पवारांच्या दिग्गज नेत्यांना शह देण्यासाठी तगडे उमेदवार मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. याबाबतची सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून छगन भुजबळ यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विचार विभागाचे राष्ट्रीय सचिव दत्ता आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भूजबळ यांच्याविरोधात मैदानात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. अलिकडेच दत्ता आव्हाड यांनी येवला विधानसभा मतदारसंघासंदर्भात राजधानी दिल्ली इथं कॉंग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे आणि मधुसुदन मिस्री यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी २० वर्ष राहिलेल्या सन्मानीय पाहुण्याला निरोप देण्याची वेळ आली आहे असं म्हणत छगन भूजबळ यांच्या वर टीका केली आहे.
“मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नाशिक येवला मतदारसंघाची त्यांना माहिती दिली. भुजबळ जातीयवादी पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसले. एवढ्या वर्षात येवला मतदारसंघाचा विकास झाला नाही. येवल्यात प्रक्रिया उद्योग आणला असता तर फायदा झाला असता,” असा दावा दत्ता आव्हाड यांनी केला आहे.
तसेच “मी शरद पवार साहेबांची, जयंत पाटील यांची भेट घेतली होती, सगळ्यांनी मविआ म्हणून आपण लढलं पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. केवळ सरकारी इमारती बांधणे म्हणजे विकास नव्हे २० वर्ष राहिलेल्या सन्मानीय पाहुण्याला निरोप देण्याची वेळ आली आहे,” असे म्हणत दत्ता आव्हाड यांनी भुजबळांविरोधात दंड थोपटले आहेत.