Bopdev Rape Case: बोपदेव सामूहिक अत्याचार प्रकरण; तीन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑक्टोबर ।। पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. प्रकरणातील तीनही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर चोरीचे तसेच त्यातील एकावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. युवतीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर कुठल्याही सीसीटीव्हीमध्ये ते सापडू नयेत यासाठी त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.


काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटामध्ये २१ वर्षीय तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे.

कोंढवा भागात अनेक वेगवेगळ्या रस्त्यांनी त्यांनी एकाच गाडीवर प्रवास केला. जेणेकरुन सीसीटीव्हीची साखळी तुटावी. मात्र, पोलिसांना तपास करताना कोंढवा भागातील एका व्यक्तीने या तिघांना ट्रीपल सीट फिरताना पाहिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दिशेने तपास केला आणि पुण्याजवळील ग्रामीण भागातून एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली‌ आणि या गुन्ह्याचा उलगडा झाला.

आरोपी गुन्हा करण्यापूर्वी एका वाईन शॉपमध्ये दारू घेण्यासाठी एकत्र आल्याचे एक सीसाटीव्ही फुटेज पोलिसांच्या तपासात समोर आले होते. या फुटेजमध्ये पीडितेच्या मित्राने आरोपींना ओळखले आणि त्याआधारे ही कारवाई करण्यात आली आहे. अख्तर, सोम्या आणि चंद्रशेखर अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या आरोपींनी २० किमी अंतरासाठी ८० किमीपेक्षा जास्त प्रवास केला.

बोपदेव प्रकरणातले तीनही आरोपी हे मध्य प्रदेशचे असून मागच्या काही वर्षांपासून पुण्यात कचरा वेचण्याचं काम करतात. बोपदेव घाटातल्या घटनेच्या रात्री तिन्ही आरोपींनी येवलेवाडीतल्या बिअर शॉपमधून बिअर विकत घेतली होती. बिअर प्यायल्यानंतर तिन्ही आरोपी बोपदेव घाटात गेले आणि पीडित मुलीवर अत्याचार केले. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर ते बोपदेव घाटातून खाली उतरले. घाट उतरल्यानंतर तिन्ही आरोपी खेड शिवापूरला गेले. पोलिसांना चकवा देण्यासाठी तिघांनी वेगळा मार्ग घेतला आणि ते रात्रभर फिरत राहिले. या दरम्यानच्या काळात त्यांनी मोबाईलचाही वापर केला नाही. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आर्टिफिशिअल इंटलिजन्सचा वापर केला, तसेच ७०० ठिकाणचे सीसीटीव्हीही पोलिसांनी तपासले. या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलिस स्टेशनने प्रसिध्द केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *