महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑक्टोबर ।। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी वांद्रे परिसरात बाबा सिद्धीकी यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. या घटनेत सिद्धीकी यांच्या मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींची ओळख पटवली असून यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. धर्मराज कश्यप असं सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमागे नेमका कुणाचा हात आहे? याचा छडा देखील पोलिसांनी लावला आहे. या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं उघड झालं आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपीपैकी करनैल सिंह हरियाणाचा तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. कर्नेल सिंग याला एका हत्येप्रकरणी २०१९ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी तो बिश्नोई गँगच्या संपर्कात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी या आरोपींना ॲडव्हान्स पेमेंट करण्यात आल्याची देखील माहिती आहे. आरोपी हे २० ते २५ दिवसांपासून बाबा सिद्धीकी यांच्यावर पाळत ठेवून होते. त्यांनी रेकी देखील केली होती, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. आरोपींना एका शस्त्र विक्रेत्याने कुरियरद्वारे पिस्तूल पाठवलं होतं, अशी माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता तपासाला वेग दिला असून बडे मासे हाती लागण्याची शक्यता आहेत.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात नेण्यात आला आहे. यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी मुस्लिम धर्मानुसार नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. ही प्रार्थना त्यांच्या राहत्या घरी मकबा हाईट येथे सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी राजकीय नेते येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ८.३० वाजता सिद्धीकी यांचा दफनविधी होणार आहे. दरम्यान, बाबा सिद्धीकी यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. “माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. हल्ल्यामागचा सूत्रधार शोधून त्याला कठोर शिक्षा देण्यात येईल”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.