महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर ।। प्रत्येक कंपनीतील कर्मचारी हा खूप मेहनत करत असतो. त्याचे रोजचे काम पूर्ण करत असतो. वर्क लाइफ बॅलेंस सांभाळून टार्गेट पूर्ण करत असतो.त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपल्या कामाची पोचपावती मिळावी, असं वाटतं असते. मग ते कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाढ किंवा बोनस मिळणे असो. प्रत्येक कर्मचाऱ्यांची आपल्या कंपनीकडून काही अपेक्षा असतात. परंतु एका कंपनीने चक्क आपल्या कर्मचाऱ्यांना कामाची पोचपावती म्हणून मर्सिडीज गिफ्ट केली आहे.
चेन्नईच्या टीम डिटेलिंग सोल्यूशन्स कंपनीने कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून बाईक आणि कार दिल्या आहेत. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी २८ कार आणि २९ बाइक दिल्या आहेत. कंपनीच्या या कृत्याची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.
आपल्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळावे, तसेच यातून प्रोत्साहन मिळून त्यांनी कंपनीसाठी अजून चांगले काम करावे, परिणामी उत्पादकता वाढावी, या उद्देशाने हे गिफ्ट देण्यात आले आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ह्युदांई, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडीज बेंज यांसारख्या कार गिफ्ट केल्या आहेत.
याबाबत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्ट श्रीधर कनन यांनी सांगितले की, ‘आम्हाला आमच्या कर्मचाऱ्याचे कामाचे कौतुक आहे, हे दाखवून द्यायचे आहे. कर्मचारी ही सर्वात मोठी मालमत्ता असते, असं आम्हाला वाटते. आमच्या कंपनीतील कर्मचारी आपल्या कामाबाबतीत खूप जास्त प्रामाणिक आहेत ते प्रचंड मेहनत करतात, याच मेहनतीचे फळ त्यांना देताना आम्हाला खूप गर्व वाटत आहे’.
श्रीधर कनन यांनी सांगितले की, ‘कंपनीतील जवळपास १८० कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यात आले आहेत.आम्ही जे कर्मचारी खूप जास्त हुशार आहेत. ज्यांचे कार घेण्याचे स्वप्न आहेत त्यांना कार गिफ्ट म्हणून दिल्या आहे. २०२२ मध्येही आम्ही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना कार आणि बाईक गिफ्ट केल्या होत्या. आम्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या परफॉर्मन्सवर आधारित कार गिफ्ट केल्या आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्याला अजून चांगली कार हवी असेल तर त्याला उरलेली रक्कम द्यावी लागणार आहे’, असंही त्यांनी सांगितले.
याचसोबत कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना लग्नासाठी ५०,००० रुपयांची मदत करते. यावर्षी त्यांनी ही लिमिट वाढवून १ लाख रुपये केली आहे. कर्मचाऱ्यांच्या लग्नासाठी १ लाख रुपये कंपनीकडून दिले जातात.