महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑक्टोबर ।। बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी सापडला आहे. पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून सोमवारी रात्री अटक केली आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीस यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे. अजूनही तिसरा आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. अख्तर अली शेख (वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. पुण्यातील बोपदेव घाट परिसरात मित्राबरोबर फिरायला गेलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीवर ३ ऑक्टोबरला रात्री सामूहिक अत्याचार झाला. तीन आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून तरुणीच्या शरीराचे लचके तोडले. इतकंच नाही, तर तिच्या मित्राला देखील जबर मारहाण केली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. कारण, रात्रीच्या अंधार त्यांचे चेहरे पीडितेला फारसे दिसले नाही. तरी देखील पोलिसांनी तरुणीच्या मित्राच्या मदतीने आरोपींचे स्केच काढले.
तसेच आरोपींची जो ओळख पटवून देईल त्याला १० लाखांचे बक्षीसही जाहीर केले. सलग दोन ते तीन दिवस घटनेचा तपास केल्यानंतर पोलिसांना महत्वाचा सुगावा लागला. परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिन्ही संशयित आरोपी कैद झाले. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका आरोपीची ओळख पटवली.
१० ऑक्टोबर रोजी येवलेवाडी परिसरातून आरोपी कनोजियाला अटक करण्यात आली होती. त्याला खाकीचा इंगा दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला. तसेच चौकशीत दुसरा आरोपी अख्तर शेख उत्तर प्रदेशातील प्रयागराजजवळ असलेल्या मूळगावी पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जात आरोपीला अटक केली. अजूनही तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.