Vidhan Sabha Election 2024 : आज दुपारपासूनच आचारसंहिता; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑक्टोबर ।। मागच्या काही दिवसांपासून सबंध महाराष्ट्र ज्या लोकशाहीच्या उत्सवाची आतुरतेने वाट बघत होता, तो क्षण आज येऊन ठेपला आहे. आज म्हणजेच मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. निवडणूक आयोगाने माध्यमकर्मींना पत्रकार परिषदेचं निमंत्रण धाडलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा मंगळवारी जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली असून दुपारी साडेतीन वाजल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागणार आहे. महाराष्ट्रासह झारखंड विधानसभेसाठीही निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये आयोगाच्या सदस्यांनी विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना मागवल्या होत्या. त्याचवेळी निवडणुका जाहीर होतील, असं वाटत असताना आयोगाने केवळ तांत्रिक माहिती देत सणांच्या तारखा टाळून निवडणुका होतील, असं म्हटलं होतं.

त्यानुसार मंगळवारी पुन्हा आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांच्या तारखा वगळून सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होईल. महायुतीमध्ये भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना; अशी थेट लढत होणार आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी अद्यापही जागावाटप जाहीर केलेलं नाही. महाविकास आघाडीमध्ये पंधरा जागांचं त्रांगडं असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी सोमवारी दिल्लीमध्ये बैठकही पार पडली मात्र अजूनही त्याबाबत निर्णय झाला नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये फारकही बरं चाललंय अशी गोष्ट नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपात कसा तोडगा निघणार, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *