महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑक्टोबर ।। तुम्हालाही या वर्षी इन्कम टॅक्स पोर्टलद्वारे टॅक्स भरण्यात अडचणी येत असतील, तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. करदात्यांना अडचणींपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने लवकरच नवीन ITR ई-फायलिंग पोर्टल सुरू करण्याची तयारी केली आहे. आयईसी 3.0 म्हणून ओळखले जाणारे हे नवीन आयकर फाइलिंग पोर्टल सुरू करण्याची तयारी जोरात सुरू आहे.
नवीन ITR पोर्टल तयार करणार
नवीन पोर्टल जुन्या पोर्टलपेक्षा चांगले कसे असेल? नवीन पोर्टल IEC 3.0 मध्ये तुम्हाला IEC 2.0 पोर्टलच्या सर्व सुविधा तर मिळतीलच पण त्यामध्ये आणखी चांगले तंत्रज्ञान देखील असणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. कर विभागाच्या अंतर्गत परिपत्रकात म्हटले आहे की, हा बदल ई-फायलिंग अनुभव सुधारण्यासाठी आणि करदात्यांना प्रक्रिया सुलभ आणि अधिक चांगली करण्याचा एक प्रयत्न आहे.
आयकर भरणे सोपे करण्यासाठी सुरक्षित आणि अनुकूल पद्धतीचा वापर करणे ही IEC 3.0 मागची कल्पना आहे. 8 ऑक्टोबर 2024 रोजी नवीन प्रकल्प IEC 3.0 (विद्यमान IEC 2.0 प्रकल्पाची जागा घेईल) आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
आयकर विभाग सध्या नवीन ITR ई-फायलिंग 3.0 पोर्टल सुरू करण्यापूर्वी लोकांचे मत घेत आहे. जेणेकरून ही प्रणाली योग्यरित्या देशासमोर आणता येईल. यासोबतच जनतेकडून सूचनाही मागविण्यात येत आहे.
प्रोजेक्ट IEC 3.0 चा उद्देश हाय स्पीड माहिती तंत्रज्ञानाला चालना देणे आहे. यामुळे ITR वर प्रक्रिया करणे शक्य होईल. यामुळे करदात्यांना कोणतीही समस्या येणार नाही आणि लवकर परतावा मिळण्यास मदत होऊ शकते. IEC 3.0 मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केल्याने करदात्यांच्या तक्रारी कमी होऊ शकतात अशी अपेक्षा आहे.